नवी दिल्ली – राज्य सरकारच्या रूग्णालयात लॅब तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रूपये मदतीचा धनादेश सुपुर्त केला.
सरकारी सेवेत असतानाच राकेश जैन या लॅब तंत्रज्ञानाला करोना झाला होता. त्यातच त्यांचे निधन झाले. ते हिंदु राव सरकारी रूग्णालयात कार्यरत होते. समाजासाठी काम करताना त्यांनी हौतात्त्म्य पत्करले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अशा करोना योध्द्यांना आमचे सरकार सलाम करते असे नमूद करीत त्यांच्या वारसांना एक कोटी रूपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपुर्त केला. घरातला माणूस गेल्यामुळे त्याची भरपाई कशानेही होत नाही हे खरे आहे. पण निदान आमच्या या आर्थिक मदतीने त्यांच्या कुटुंबियांचे पुढील जीवन काही प्रमाणात सुकर होईल असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला आहे.