भुवनेश्वर – ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या या भाजप आमदाराचे नाव सुभाष चंद्र पाणिग्रही असे आहे.
त्यांनी राज्यातील तांदुळ खरेदीच्या मुद्द्यावर आक्रमक होत हा टोकाचा निर्णय घेतला. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत तांदुळ खरदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा सर्व प्रकार घडला.
आमदार सुभाष चंद्र यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखले. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकाऊन घेतले. सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे. शेतकरी तांदुळ खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त असून त्याकडे कुणीही लक्ष देत नाही असे पाणिग्रही यांचे म्हणणे होते.
ओडिशा राज्य सरकारने आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत वारंवार उपस्थित करुनही सरकार शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच आपण सॅनिटायझर पिण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आमदार पाणिग्रही यांनी केला.
याआधी सकाळी भाजप आमदार पाणिग्रही यांनी सरकारला आत्महत्येचा इशाराही दिला होता. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात त्यांनी आंदोलनही केले होते. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचा तांदुळ खरेदी करा, अन्यथा आत्मदहन करेल, अशी धमकी दिली होती.