नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीने देशात वातावरण गरम आहे. माध्यमांमध्ये सातत्याने या विषयावर बातम्या, चर्चासत्रे झळकत आहेतच; शिवाय विविध राजकीय पक्ष इंधन दरवाढीविरोधात देशभर आंदोलने करताना दिसत आहेत. शिवाय, सायकलच्या प्रचाराच्या मोहिमाही काढल्या जात आहेत; अथवा बॅटरीवरील वाहनांची मोठी जाहिरातबाजीही केली जात आहे.
दुसरीकडे मात्र पेट्रोल पंपांवरील वाहनांच्या रांगा काही कमी होताना दिसत नाहीत; शिवाय सर्व वाहन उत्पादकांच्या फेब्रुवारीच्या विक्रीमध्ये 1 टक्काही घट दिसून आलेली नाही. याचाच अर्थ, देशाच्या वाहन उद्योगावर पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी उंचीवर पोहोचणे आणि वाहनांच्या किमती वाढण्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
वर्ष 2021 च्या फेब्रुवारीत कार आणि टु-व्हिलरच्या विक्रीत वाढ पाहायला मिळाली आहे. ही वाढ सलग सातव्या महिन्यात कायमच आहे.
वाहन उद्योगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीत सुमारे 3.08 लाख कार आणि एसयूव्ही कारखान्यांतून निघून शोरूम्समध्ये पोहोचल्या आहेत. वार्षिक आधारावर या प्रकरणात 23 टक्के वाढ नोंदली आहे. प्रवासी वाहनांची विक्री वाढल्याच्या प्रकरणात टाटा मोटर्स सर्वात पुढे राहिली. फेब्रुवारीत या कंपनीने 27,225 प्रवासी वाहनांची विक्री केली. हा आकडा गेल्या फेब्रुवारीत झालेल्या विक्रीच्या तुलनेत 120 टक्के जास्त आहे.
आता आणखी चांगली वाहनविक्री होण्याच्या आशेत सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री वाढली आहे. लोक वैयक्तिक सुरक्षेसह प्रवासी वाहनाकडे अधिक लक्ष देत आहेत. पुरवठा साखळी आधीपेक्षा चांगली आहे, मात्र यामध्ये पूर्णपणे सुधारणा होऊ शकली नाही. पुरवठा साखळी आणखी चांगली राहिल्यास विक्रीचे आकडे आणखी जास्त होऊ शकत होते.