पुणे – करोना बाधितांची अपुरी माहिती महापालिकेला पाठवल्याबद्दल महापालिकेने आठ “पॅथॉलॉजी लॅब’ ना नोटीस पाठवल्या आहेत. मागील आठवड्यात “लॅब’चालकांची बैठक घेऊन त्यांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. तसेच अपुरी माहिती दिल्यास परवाना रद्द करण्याबाबत इशाराही दिला होता. तरीही आठ पॅथॉलॉजी लॅबने अपुरी माहिती दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करोना बाधित रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांची माहिती 24 तासांच्या आत लॅबचालकांनी महापालिकेला कळवणे आवश्यक आहे. त्यानुसार ते बाधितांची माहिती कळवतात, परंतु त्यामध्ये बाधितांची माहिती अपुरी दिलेली असते. त्यामुळे संबंधित रुग्णाला शोधणे अडचणीचे होऊन बसते.
अनेकदा पत्ता अपुरा, चुकीचा किंवा अर्धवट मोबाइल नंबर दिले जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शहरातील किमान 15 पॅथॉलॉजी लॅबचालकांनी महापालिकेने तातडीने बैठक बोलावली होती. त्यामध्ये महापालिका आयुक्तांनी त्यांना कडक सूचना दिल्या होत्या. असे असतानाही लॅबचालकांनी त्यात कसूर केली. त्यामुळे सांगूनही अशी चूक करणाऱ्या आठ लॅबचालकांना महापालिकेने थेट नोटीस बजावली आहे.
केईएम हॉस्पिटल, सह्य्राद्री हॉस्पिटल, सबर्बन लॅब, एजी डायग्नोस्टिक, मेट्रो पॉलिस, भारती विद्यापीठ, मेडीफी, क्रश्ना यांना ही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.वारंवार अशी चूक झाल्यास लॅब चालकांचा परवानाच रद्द करण्यात येणार असल्याचे सहआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.