नवी दिल्ली – भारतीय महिला मुष्टियोद्धा अल्फिया पठाणने आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे. तिने मोंटेनीग्रो येथे सुरू असलेल्या 30व्या ऍड्रियाटिक पर्ल स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच अन्य पाच भारतीय मुष्टियोद्धांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आशियाई ज्युनियर चॅम्पियन अल्फियाने दमदार प्रदर्शत करत मोलदोवाच्या डारिया कोजोरेवचा अंतिम फेरीत 5-0 असा पराभव केला. या विजयासह तिने 81 किलो वजनी गटातून सुवर्णपदक जिंकले. तसेच 51 किलो वजनी गटात भारताच्या बेबीरोजीसना चानूने उझबेकिस्तानच्या फिरोजा काजाकोवाचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
रोहटकच्या विंकाने 60 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत फिनलॅंडच्या सुवी तुजुलावर मात केली आहे. आता अंतिम फेरीत तिचा सामना मोलदोवाच्या ख्रिस्टियन कायपेरशी होणार आहे. 69 किलो वजन गटात अरुंधतीने 5-0 असे निर्विवाद यश मिळवित आगेकूच केली. तसेच सनामाचा चानूने उझबेकिस्तानच्या सोखिबा रुझमेतोवाचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता तिचा सामना भारताच्याच राज साहिबाशी होणार आहे.