नवी दिल्ली, -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सलग दहाव्या दिवशी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. त्यामुळे राजस्थानपाठोपाठ मध्यप्रदेशात पेट्रोलच्या दराने शतक नोंदवले.
सार्वजनिक कंपन्यांनी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 34 पैशांची, तर डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ केली. त्यामुळे मध्यप्रदेशच्या अनुपपूरमध्ये पेट्रोलचा दर 100 रूपये 25 पैशांवर पोहचला. त्या शहरात डिझेल दरानेही 90 रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये बुधवारी पेट्रोल दराने सर्वप्रथम शंभरी ओलांडली. सार्वजनिक कंपन्यांकडून इंधन दरांत केले जाणारे बदल देशभरात लागू होतात. मात्र, स्थानिक कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) भिन्न आकारणीमुळे राज्याराज्यांत इंधन दर वेगवेगळे असतात. देशात पेट्रोलवर सर्वांधिक व्हॅट राजस्थानात आकारला जातो. त्याखालोखाल मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. दरवाढीच्या सत्रामुळे अवघ्या 10 दिवसांत पेट्रोल 2 रूपये 93 पैशांनी, तर डिझेल 3 रूपये 14 पैशांनी महागले आहे.
मागील वर्षाच्या मार्चपासून पेट्रोलच्या दरात तब्बल 20 रूपयांची, तर डिझेलच्या दरात सुमारे 18 रूपयांची वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 90 रूपयांच्या घरात, तर डिझेल 80 रूपयांवर पोहचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 96 रूपये 32 पैसे, तर डिझेलचा दर 87 रूपये 32 पैसे इतका आहे.