किवळेत झाडावर वीज कोसळली तर चिंचवडमध्ये झाड पडले..

शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी

पिंपरी (प्रतिनिधी) – अवकाळी पावसाने सलग दुसऱ्यादिवशी गुरुवारी (दि. 18) शहरात हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजता सोसाट्याचा वारा वाहू लागल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यादरम्यान देहूरोडनजीकच्या किवळे, विकासनगरमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे या झाडाने पेट घेतला. तर दुसऱ्या घटनेत चिंचवडमधील काकडे पार्कमध्ये झाड पडल्याचे वृत्त आहे.

सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. याशिवाय आंदर मावळात गारांचा पाऊस झाल्याने, पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी तुरळक प्रमाणात
शहराच्या विविध भागांत अवकाळीने हजेरी लावली.

तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच वातावरण ढगाळ झाले होते. त्यानंतर सोसाट्याचा वारा वाहायला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीने शहर व परिसरात हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

अवकाळीमुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मध्यम व हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवमाना विभागाने वर्तविला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.