पुणे – गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (15 फेब्रुवारी) शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल केला असून, शिवाजी रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले.
शिवाजी रस्त्याहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्ता या मार्गाचा वापर करावा. तर, स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनच्या दिशेने जाणाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकातून जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
लक्ष्मी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हमजेखान चौकातून वळून कस्तुरे चौकमार्गे जावे. लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकाकडे (अलका टॉकीज) जाणाऱ्या वाहनचालकांनी सोन्यामारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौक, जिजामाता चौक, फुटका बुरुज, महापालिकेमार्गे झाशीची राणी चौकाकडे जावे. बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक गर्दी वाढल्यास टिळक रस्त्यावर पूरम चौकातून वळविण्यात येणार आहे. वाहनचालक टिळक रस्त्याने खंडोजीबाबा चौकात जातील. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने केले आहे.