पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची 68 पदे मंजूर असून त्यातील 27 रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामाचा निपटारा करण्यासाठी कसरतच करावी लागते आहे.
पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमधील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्या विविध प्रकरणांवर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात कामे होतात. शालार्थ आयडी, संच मान्यता, विषय मान्यता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, सांकेतांक क्रमांक आदींचीप्रकरणे या कार्यालयात मान्यतेसाठी दाखल होत असतात.
रिक्त पदांमुळे प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाची सूत्रे औदुंबर उकिरडे यांच्याकडे आल्यानंतर प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली जात आहेत. यामुळे शाळा, शिक्षक, कर्मचारी यांना काहीसा दिलासा मिळत आहे. या कार्यालयातील 41 पदे भरली आहेत. सहायक अधिक्षक 1, विज्ञान सल्लागार 1, सहायक शिक्षण उपनिरीक्षक 1, प्रशासन अधिकारी 8, वरिष्ठ लिपिक 2, कनिष्ठ लिपिक 5, वाहनचालक 2, शिपाई 5, रखवालदार 1, माळी 1 ही पदे रिक्त आहेत. तीन वर्षांपेक्षा जास्त वर्ष काम करत तळ ठोकून असलेलेही काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आहेत. त्यांच्याही बदल्या होत नाहीत.
काही खासगी अनुदानित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक, शिपायांची पदे अतिरिक्त आहेत. त्यांचे समायोजन कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. वेतन पथक अधीक्षकांच्या सल्ल्यानुसार या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे सोयीच्या ठिकाणी समायोजन करण्यात येत आहे. त्यातूनच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातही पाच शिपाई, पाच कनिष्ठ लिपिकांचे तात्पुरते समायोजन झाले आहे. याद्वारे आता कार्यालयातील कामांना हातभार लागत आहे.