- 61 रुग्णांची नोंद – 34 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या आतमध्ये आली. आज 61 जणांना करोनाची लागण झाली. तसेच 34 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 1 लाख 452 जणांना करोनाची लागण झाली.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 61 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात पिंपरी येथील एका 67 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत 2569 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1810 तर शहराबाहेरील 759 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 34 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 96653 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 645 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 641 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 580 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1409 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1989 इतकी आहे.