लोंबार्डी – अन्य रुग्णांना बेड खाली करण्यासाठी करोना वॉर्डातील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या आरोपावरून इटलीत एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
याबाबतची खळबळजनक माहिती अशी, नातेला बस्सी या 61 वर्षीय आजी आणि ऍजेलो पॅलेट्टी या 80 वर्षीय वृद्धास लोंबार्डी येथे मार्च महिन्यात ऍनेस्थिशियाचा अतिरिक्त डोस देऊन त्यांची हत्या करण्यात आली. हा प्रकार इटलीत मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट भयावह अवस्थेत होती त्यावेळी करण्यात आला. कार्लो मोस्का या 47 वर्षीय डॉक्टरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या रुग्णालयाच्या ए आणि ई वॉर्डचा मोस्का हा प्रमुख होता. त्याने बेड खाली करण्यासाठी पेशंटस्ना मारले असावे अशी चर्चा व्हॉटस्ऍप मेसेजीसवर परिचारिका करत होत्या. याबाबतच्या टेक्स्ट मेसेजमध्ये या परिचारिका म्हणतात, त्यांना व्हेंटीलेटर लावल्याशिवाय औषध देण्यास तुला त्यांनी सांगितले होते का? त्यांना बेड खाली करायचे होते म्हणून मी रुग्णांची हत्या करणार नाही आणि हा वेडपटपणा आहे, असे संभाषण होते.
त्या रुग्णांना औषध देत असताना या डॉक्टरने सर्व सहकाऱ्यांना बाहेर जायला सांगितले होते, असा आरोपही पोलिसांनी केला आहे. मोस्काने पीडितांच्या मेडिकल रिपोर्टमध्येही फेरफार केल्याच्या संशयावरून आणखी तीन मृत्यूच्या प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या या खुलाशानंतर त्याला मॉन्टिचिआरी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आले.