नवी दिल्ली – सोमवारी भारतीय सराफत सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्याचबरोबर रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे भारतीय सराफात सोन्याचे दर वाढले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचे दर 117 रुपयांनी वाढून 48,332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचे दर 541 रुपयांनी वाढून 64,657 रुपये प्रति किलो झाले. सोमवारी सकाळी रुपयाचे मूल्य 21 पैश्यांनी कमी झाल्यानंतर सोन्याच्या दरावर परिणाम झाला.
रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर सोने आयात महागात पडते. भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करतो. त्यामुळे रुपयाच्या दराचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,834 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर 25 डॉलर प्रति औंस झाले.