नंदीग्राममधून लढणार ममता बॅनर्जी

सुवेंदु अधिकारी यांना थेट आव्हान

नंदीग्राम – तृणमुल कॉंग्रेस सोडून भाजपची साथ करणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांना थेट निवडणूक मैदानात आव्हान देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला आहे. त्यांनी अधिकारी यांच्या नंदीग्राममधूनच त्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. आज येथे एका जाहीर सभेतच त्यांनी ही घोषणा करून उपस्थितांना चकित केले.

त्या म्हणाल्या ज्यांनी तृणमुल कॉंग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला त्यांच्याविषयी मला फार चिंता वाटत नाही. कारण तृणमुल कॉंग्रेसची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी सोडून गेलेल्यांपैकी कोणीही पक्षात नव्हते. सुवेंदु अधिकारीही पक्षात नंतर आले असे त्या म्हणाल्या. गेल्या काहीं वर्षात ज्या नेत्यांनी पैशाची लूट केली ते पैसे वाचवण्यासाठी ते पक्षांतर करीत आहेत असा आरोपही त्यांनी अधिकारी यांचे नाव न घेता केला.

बॅनर्जी म्हणाल्या की नंदीग्रामशी माझे भावनिक नाते आहे आणि कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात मी नंदीग्राम मधूनच केली आहे. त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून तृणमुल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुव्रत बक्षी यांनी माझ्या उमेदवारीला अनुमती द्यावी अशी विनंतीही त्यांनी त्यांना केली. यावेळी स्वता बक्षी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी तातडीने ही विनंती मान्य करण्यात आल्याचे घोषित केले. नंदीग्राम हे ठिकाण टाटांच्या नॅनो प्रकल्पामुळे आणि त्याच्या विरोधात ममतांनी केलेल्या आंदोलनामुळे लोकांच्या लक्षात राहिले आहे.

ममता बॅनर्जी या सध्या दक्षिण कोलकातामधील भवानीपोर मतदार संघाच्या आमदार आहेत. काही जणांनी पश्‍चिम बंगाल भाजपला विकण्याचा कट रचला आहे असेही त्यांनी नमूद केले. ज्यांनी पक्ष सोडला त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाची संधी मिळाली तरी बंगाल विकण्याचे स्वप्न त्यांना कधीच पुर्ण करता येणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.