बेंगळुरू – अभयारण्य अथवा राष्ट्रीय उद्यानांमध्ये हिंस्त्र श्वापदे, वन्य प्राणी पहाण्याची माणसाला तीव्र इच्छा असते. त्यामुळे ताडोबा अभयारण्य, पेंच, नवेगाव-बांध अशा विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांची गर्दी दिसून येते. मात्र, वनक्षेत्रात मुक्तपणे संचार करत असलेल्या या श्वापदांना पर्यटकांचा त्रास होत असतो, हे आपल्या गावीही नसते. खरे तर याविषयावर हॉलिवुडमधला “प्रे’ (भक्ष्य) नावाचा सिनेमाही प्रसिद्ध आहे, ज्यात पर्यटक कुटुंबाच्या सफारीवर आफिकेतल्या जंगलातले सिंह हल्ला करतात आणि किमान चार जणांचे बळी घेतात.
साधारणपणे या सिनेमाची आठवण होईल, अशी घटना बेंगळुरूजवळच्या बनेरघट्टा बायॉलॉजिकल पार्कमध्ये घडली आहे. पर्यटकांची सफारी या पार्कमध्ये रस्त्यावर थांबलेली असताना एका पट्टेरी वाघाने या सफारी कारचा मागचे बंपर कुरतडून ओढल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातील एक वाघ सफारीचे बंपर चावताना दिसत असून, नंतर तिथे आणखी एक वाघ आल्याचे दिसते.
वाघ आपल्या कारचा बंपर कुरतडत आहे, हे पाहून कारमधील पर्यटकांनी ती कार रिव्हर्स घेत, वाघाला हुसकावून लावल्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येत आहे. बनेरघट्टामधील निसर्गप्रेमी मोना पटेल यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केला असून, राखीव वन क्षेत्रातल्या वाघांच्या अंगावर कार घालण्याच्या पर्यटकांच्या कृतीचा निषेध केला आहे. या कार रिव्हर्स घेण्याने तो वाघ मरण पावण्याची शक्यता होती, असे पटेल यांचे म्हणणे आहे.
Tiger pulling tourist vehicle in Bannerghatta park , Bengaluru
😣
Recieved on whatsapp pic.twitter.com/TfH8mAiN2b— Mona Patel 🇮🇳🐅🌳(Modi Ka Parivar) (@MonaPatelT) January 15, 2021
बनेरघट्टा बायॉलॉजिकल पार्कच्या वनाधिकारी वनश्री विपिन सिंग म्हणाल्या की, बॅटरी नादुरुस्त झाल्याने पर्यटकांची ही कार काही दिवसांपूर्वी वनक्षेत्रात बंद पडली होती, त्यावेळचा, म्हणजे सुमारे 15 दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे. वाघ तेथून निघून गेल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ती कार दुरुस्तीला पाठवण्यात आली.