नवी दिल्ली : देशात लसीकरणाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या लसीकरणामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत होणार आहे. मात्र असे असले तरी या लसीकरणाचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
महिपाल सिंह असे मृत्यू झालेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. शनिवारी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेतल्यानंतर त्यांना लगेचच त्रास व्हायला लागला. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
महिपाल यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, लस घेण्यापूर्वीच त्यांना काहीसा त्रास होत होता. पण, लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार आहे.
दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी, लस घेतल्यानंतर 51 जणांमध्ये नॉर्मल तर एकामध्ये गंभीर साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले असल्याचे म्हटले आहे. या 22 वर्षीय तरुणाची लस घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्याला एम्सच्या आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच कोलकात्यात एका 35 वर्षीय नर्सला लस घेतल्यानंतर आयसीयूत दाखल करण्यात आले. यावर काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडण्याचे हे ऍलर्जीक रिऍक्शनचे प्रकार आहेत. त्यामुळे लसींपासून घाबरण्याचे कारण नाही.