गणेश भक्तांमध्ये नाराजी : घंटानाद, महाआरतीद्वारे निषेधाचा इशारा
पुणे – मार्केटयार्डातील श्री शारदा गजानन मंदिराचे गोडाऊन सील केल्यामुळे बाजारातील गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी (दि. 14) गोडाऊनचे सील न काढल्यास पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह गणेशभक्तांतर्फे मार्केटयार्ड गणपती मंदिरात घंटानाद आणि महाआरती करून निषेध करण्याचा इशारा बाजारातील गणेशभक्तांनी दिला. पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नांनंतर यावरही वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी रविवारी श्री शारदा गजानन मंदिरालगतचे अनधिकृत बांधकाम आणि टपरी दोन दिवसांत पाडण्याचे आदेश देत मंदिराच्या बेसमेंटमधील गोडाऊन सील केले. त्यामुळे गणेशभक्तांनी गुरुवारी मंदिरात बैठक घेत गोडाऊन खुले न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. या बैठकीस बाजार घटकांतील सर्व गणेश भक्त उपस्थित होते.
याबाबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश घुले म्हणाले, वीस वर्षांपूर्वी बाजार समितीने ठराव करून मंदिरासाठी जागा दिली. त्यानुसार आम्ही बांधकाम केले. समितीच्या संमतीने बांधकाम केलेल्या जागेत समितीच्या परवानगीनेच एकजण चहा विक्रीचा व्यवसाय करत आहे. तसेच, तेथे मंदिराचा सुरक्षारक्षक राहात आहे. त्या जागेपोटी मंडळाला भाडे मिळत असले तरी त्यातून मंदिर व्यवस्थापनाचा खर्च आणि दररोज 400 ते 500 भक्तांना प्रसादाच्या माध्यमातून अल्पापोहार दिला जातो. दुसरीकडे मुख्य गणपती मंदिराच्या बेसमेंटमधील 75 टक्के जागा मंडळाने समितीला ग्रंथालयासाठी दिली होती.
मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासूून त्याचा वापर होत नाही. त्यामुळे संबंधित जागा बाजारात येणाऱ्या शेतकरी आणि कामगारांना मोफत पोटभर जेवण उपक्रमासाठी द्यावी, अशी मागणी आम्ही समितीकडे निवेदनाद्वारे महिनाभरापूर्वी केली होती. मात्र, समितीने ती दिली नाही. मात्र, कोणत्याही चर्चेविना अथवा नोटीस न बजावता समितीने बांधकाम पाडण्याचा निर्णय घेत गोडाऊन सील केले. त्यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
गोडाऊन सील केल्याच्या विषयावर चर्चा करण्याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यानुसार मी गुरुवारी (दि. 14) वेळ दिली आहे. त्यामध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये यावर निर्णय होईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे