पुणे – राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित आणि शेजारीच असलेल्या राज्याच्या मध्यवर्ती लस भांडारात सुमारे दीड कोटी लसींची साठवणूक करण्याची क्षमता आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही संस्थांकडून जेव्हा मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, तेव्हा त्याची साठवणूक या भांडारात केली जाणार आहे.
आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि आरोग्य सेवा परिवहन विभागाचे प्रमुख मिलिंद मोरे यांच्या देखरेखीखाली या विभागाचे काम चालते. आरोग्य साधनसामग्री देखभाल विभागाचे अधिकारी विद्याधर आभाने यांनी या भांडाराविषयी माहिती दिली.
या भांडारामध्ये तीन कोल्डरूम आहेत; ज्या “वॉकिंग’ म्हणजे जेथे चालत जाऊन पाहणी करता येते. त्यापैकी दोन जुने आणि तीन नव्याने बसवण्यात आले आहेत. प्रत्येकी कोल्डरूमची क्षमता 30 लाख लसींची आहे. त्यामुळे पाच कोल्डरूम मिळून दीड कोटी लसींची साठवण करू शकतो, असे आभाणे यांनी सांगितले.
या ठिकाणी सद्यस्थितीत नेहमी देण्यात येणाऱ्या बीसीजी आणि अन्य लसी ठेवण्यात येतात. यामध्ये करोनाच्या लसींची साठवण आता करण्यात येणार आहे.