नगर- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी 31 डिसेंबरला जाता-जाता घेतलेल्या संशयास्पद निर्णयांना आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चाप लावला. मायकलवार यांनी अखेरच्या दिवशी घेतलेले सर्वच निर्णय तत्काळ स्थगित करण्याच्या सूचना देवून घेतलेल्या निर्णयांची खातेनिहाय चौकशी करा, असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व ज्येष्ठ नागरिक कृती समितीचे शशिकांत चंगेडे यांनी या निर्णयांवर संशय व्यक्त करत जिल्हाधिकार्यांकडे या संदर्भात चौकशीची मागणी केली होती. तसेच घेतलेल्या सर्व निर्णयांपाठीमागे अर्थकारण असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली होती.
महापालिका सभेची मान्यता नसताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे थेट अधिकार तसेच आरोग्य विभागाचा संपूर्ण कारभार देण्यात आला होता. त्याशिवाय आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्याकडे नगरसचिवपदाचा, प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे सामान्य प्रशासन व सचिन राऊत यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यात आला होता. विशेष म्हणजे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी सन 2010 पासून नॉनप्रॅक्टिस भत्ता देण्याची मागणी केली होती. ती देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हे सर्वच आदेश अतितत्काळ स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश उपायुक्त प्रदीप पठारे यांनी काढले आहेत. तसेच ज्या आदेशांवर श्रीकांत मायकलवार यांनी जाता-जाता सह्या केल्या. त्या सर्वच फायली व त्यावरील योग्यतेच्या टिप्पणीसह मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चौकशीवरुन प्रशासनाला आता काय अहवाल जाईल? याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.