नगर- जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने बाळ बोठे याच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी बोठे पसार असलेल्या मुद्यावर बोठे याच्यावतीनेच पारनेर न्यायालयात आक्षेप घेण्यात आला आहे.
बोेठे याच्यावतीने अॅड. संकेत ठाणगे यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांना बोठे यांस अटकपूर्व जामीन मिळू द्यायचा नाही. त्यांच्या नैसर्गिक हक्कावर पोलीस गदा आणू शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या स्टँडिंग ऑर्डरवर आदेश देऊ नयेत, असा युक्तिवाद बोठे याच्यावतीने अॅड. ठाणगे यांनी केला.
तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या संदर्भात बोठे याच्या स्टँडिंग ऑर्डरसाठी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर आज निर्णय अपेक्षित होता. तथापि, त्यावर उशिरापर्यंत निकाल झालेला नव्हता.