पुणे – वर्षाची अखेर आणि नववर्षाचे स्वागत या निमित्ताने होणाऱ्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने हॉटेल रेस्टॉरंट, बार, वाइन शॉपवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 151 ठिकाणांची तपासणी केली असून त्यातील 89 जणांवरील कारवाई प्रलंबित ठेवली आहे. तसेच, एकूण 17 हजार रुपयांचा दंडही वसूल केला. सर्वाधिक दंड बारमधून वसूल करण्यात आला.
सॅनिटायझेशन, अन्नाचा दर्जा, वाइन शॉप्समधील साठा, बारमधील सॅनिटायझेशन या सगळ्यांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे करण्यात आली. त्यामध्ये 86 हॉटेल्समधून 12 नमुने गोळा केले. त्यातील 30 जणांना सुधारणा करण्याविषयीची नोटीस देण्यात आली. त्यातील दोन प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली, तर चार हजार रुपये दंड वसूल केला. मात्र, उर्वरीत 58 जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.
10 रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली, त्यातील दोन ठिकाणांहून नमुने घेण्यात आले. 15 जणांना सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावली. दोन प्रकरणे तडजोडीने सोडवली, तर सात ठिकाणांवरील कारवाई प्रलंबित आहे.
सर्वाधिक दंड बारच्या तपासणीतून वसूल केला. 44 बारमध्ये तपासणी करण्यात आली. सहा ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले. 15 जणांना सुधारणा करण्याची नोटीस दिली. दोन प्रकरणे तडजोडीने मिटवली आहेत. मात्र, त्यांच्याकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, 22 प्रकरणे कारवाईसाठी प्रलंबित आहेत.
11 वाईन शॉपच्या तपासणीत सहा ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यातील आठ जणांना सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस, तर दोघांवरील कारवाई प्रलंबित आहे.