दौंडमध्ये रेल्वे पुलाचे खोदकाम : दीडशे वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज
दौंड – दौंड येथील भीमा नदीच्या पात्रात रेल्वे मार्गाच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना महादेवाची मूर्ती आढळली. ही मूर्ती अंदाजे एक ते दीड टन वजन आणि पाच फूट उंचीची आहे. ही मूर्ती नेमकी कोठून आली की याच परिसरातील आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत
दौंडच्या भीमा पात्रात रेल्वे मार्गाच्या कामासाठी 28 मोऱ्याच्या पुलानजीक पोकलेन मशीनच्या साह्याने खोदकाम सुरू आहे. शनिवारी (दि.26) सायंकाळच्या सुमारास 10 फूट खोलीवर महादेवाची ही मूर्ती दिसून आली.
प्रथमदर्शनी ही मूर्ती सिमेंट आणि विटा, वाळूच्या मिश्रणापासून तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. काही भाग हा दगडापासून तयार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मूर्तीच्या अर्धा भागाचा रंग अजूनही दिसत आहे. ही मूर्ती 100 ते 150 वर्षे जुनी असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
ही मूर्ती नदीपात्रात नेमकी कोठून आली की येथेच नदीपात्रात महादेवाचे जुने मंदिर आहे, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. काहीजणांच्या मते ही मूर्ती पुरात वाहून आली असावी तर काहीजण ही मूर्ती म्हणजे मंदिरावरील शिखर असावे, असा अंदाज व्यक्त करीत आहेत.