श्रीहरीकोटा, (आंध्रप्रदेश) – “सीएमएस-01′ या संचार उपग्रहाचे आज श्रीहराकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले. करोनाच्या साथीच्या काळात प्रक्षेपित करण्यात आलेला हा दुसरा उपग्रह आहे. “इस्रो’च्या “पीएसएलव्ही’-सी50 या रॉकेटवरून हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. प्रक्षेपण केल्यानंतर जवळपास 20 मिनिटात हा उपग्रह अवकाशात स्थिर झाला.
“सीएमएस -01′ हा “इस्रो’चा 42 वा संचार उपग्रह आहे. हा उपग्रह भारत, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅंडमध्ये सेवा उपलब्ध करुन देणार आहे. उपग्रहाचे काम खूप चांगले सुरू आहे, असे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. उपग्रहचे सोलर पॅनेल आता सक्रिय झाले आहेत, असेही सिवन यांणी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आणखी चार दिवसांनी हा उपग्रह अंतराळातील “जी-10’अ या नियोजित ठिकाणावर पोचवला जाईल. “जीसॅट-12′ या 11 वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या जागेवर हा उपग्रह कार्यान्वित होणार आहे. “सीएमएस-01′ या उपग्रहाची आयुमर्यादा 7 वर्षे असणार आहे. हा उपग्रह नियोजनाप्रमाणे आपली सर्व कामे चोख बजावेल, असा विश्वासही सिवन यांनी व्यक्त केला आहे.
“इस्रो’ भविष्यात चांद्रयान-3, अदित्य एल-1, गगनयान आणि “एसएसएलव्ही’ (स्मॉल सॅटेलाईट् लॉंच् व्हेईकल) या मोहिमा राबवणार आहे.