तापसी पन्नू आणि ताहीर राज भसीन यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी ‘लूप लापता’ चे शूटिंग सुरू केले आहे. खरेतर या सिनेमाचे शूटिंग उन्हाळ्यातच सुरू होणार होते. मात्र करोनाच्या साथीमुळे त्याला उशीर झाला. आता “लूप लापता’ चे 25 दिवसांचे शेड्युल मुंबईमध्ये सुरू झाले आहे. त्याच्यानंतर गोव्यामध्ये शूटिंग होणार आहे. तापसी आणि ताहीर राज भसीन हे दोघेही या शूटिंगसाठी थोडे नर्व्हस आणि एक्साईटही झाले आहेत.
सिनेमाच्या तयारीसाठी पूर्वी जो उत्साह होता. तो आता बराच ओसरला आहे. तेव्हाची पॉझिटिव्ह एनर्जी आता जाणवत नसल्याचे दोघांनाही वाटते आहे. अजूनही करोनाचे निर्बंध असल्याने शूटिंगला थोड्या मर्यादा आहेत. अगदी थोड्या कलाकार आणि तंत्रज्ञांना बरोबर घेऊन शुटिंग करावे लागते आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुण्याचे पथ्य पाळावे लागते आहे, याचे तापसीला भान ठेवावे लागते आहे.
‘लूप लापता’ हा 1998 च्या ‘रन लोला रन’ या जर्मन सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. आपल्या बॉयफ्रेंडचा जीव वाचवण्यासाठी केवळ 20 मिनिटात 1,00,000 डच मार्क इतके पैसे मिळवण्यासाठी एका मुलीने केलेली प्रचंड धावपळ या सिनेमात बघायला मिळणार आहे.