पुणे – गवा हा आकाराने मोठा प्राणी आहे. त्याचे वजन साधारण 700 ते 800 किलो असते. अशावेळी त्याला भुलीचे इंजेक्शन देताना म्हणजेच “डार्ट’ करताना, अधिक प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आवश्यक असतो. मात्र, गव्याच्या बचाव मोहिमेतील अधिकाऱ्यांना याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्याने बचावकार्य लांबल्याची शक्यता वन्यप्रेमी वर्तवत आहेत.
या गव्याच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. पण, या बचाव कार्याबद्दल शंकादेखील उपस्थित होत आहेत. काहींच्या माहितीनुसार, “गव्याला बेशुद्ध करण्यासाठी चार प्रयत्न करण्यात आले. मात्र यापैकी तीन अपयशी ठरले. त्यावरून गव्याला डार्टसाठी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी हे पुरेसे प्रशिक्षित नसल्याने असा प्रकार घडला असावा.’
या बचावकार्यात सहभागी वन्यजीव रक्षक अनिलकुमार खैरे म्हणाले, “वनविभागाने योग्यप्रकारे व्यवस्थापन करून ही बचावमोहीम सुरू केली. बचावकार्य सुरळीतपणे सुरू होते. मात्र, बघ्यांची गर्दी वाढली. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांकडील मनुष्यबळ कमी पडले, वाढलेल्या गोंगाटामुळे गवा घाबरला आणि सैरभैर झाला. त्यामुळे तो जास्त जखमी झाला. अशा बचाव मोहिमेत गर्दीचे नियंत्रण आणि पोलिसांकडून तातडीचा प्रतिसाद ही अतिशय महत्त्वाची बाब असते. त्याबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.’
औषधांचा “ओव्हरडोस’ नाही
गव्याच्या मृत्यूनंतर याबाबत वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाने प्राथमिक तपासणी केली आहे. या अहवालात औषधांचा “ओव्हरडोस’ आढळला नाही, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.