अहमदाबाद -गुजरातमधील महत्वाचे शहर असणाऱ्या अहमदाबादेतील रात्रीची संचारबंदी बेमुदत काळासाठी वाढवण्यात आली आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले आहे.
अहमदाबादमध्ये 23 नोव्हेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. तिची मुदत सोमवारी समाप्त होणार होती. मात्र, गुजरातमध्ये रविवारी अहमदाबादेत सर्वांधिक 306 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे त्या शहरातील रात्रीची संचारबंदी आणखी काही काळ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ती संचारबंदी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. त्या कालावधीत नागरिकांना घरांमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पायी किंवा वाहनांमधून फिरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.
गुजरातच्या सुरत, राजकोट आणि वडोदरा शहरांतही 21 नोव्हेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुजरातमधील करोनाबाधितांच्या संख्येने याआधीच 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये अहमदाबाद जिल्ह्याचा वाटा 52 हजारांपेक्षा अधिक आहे.