- प्रचार साहित्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरले
पिंपरी – पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार नीता संजय ढमाले या प्रचार साहित्यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरुन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे छायाचित्रांचा वापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षातर्फे ढमाले यांना पत्र पाठवले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून रितसर पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघामधून ज्योती श्रीनिवास ढमाले म्हणजेच नीता संजय ढमाले या नावाने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार बेकायदेशीररीत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या नावाचा वापर आपल्या प्रचारासाठी करीत आहेत. महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधर मतदार संघासाठीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अरूण लाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
मात्र, ढमाले या अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला नुकसान व्हावे यासाठी जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर करत आहेत. महाविकास आघाडीतर्फे ढमाले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली नाही वा त्यांना पाठिंबाही दिलेला नाही, असे असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार, तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या प्रचार साहित्यामध्ये छायाचित्र टाकून ढमाले या त्यांच्या नावाचा अनधिकृतपणे वापर करून मतदारांची दिशाभूल करत आहेत.
ढमाले यांनी या बेकायदेशीर बाबींचा प्रचार साहित्य म्हणून वापर न थांबवल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर करवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे देण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षातर्फे तसे पत्र ढमाले यांना पाठवले आहे.