मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
तत्पूर्वी, गायकवाड यांनी मागील आठवड्यात भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत बंडाचे निशाण फडकावले होते. यानंतर त्यांनी पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार देखील सुरु केला होता. यानंतर आज गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हातावर घड्याळ बांधले.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “”त्या पक्षात कसा राहू जेथे मानसन्मान मिळत नाही चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातो. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहे. काही खुकांर लोकांनी भाजपचा ताबा घेतला आहे”
“जिथे कोंडमार होतो तिथ राहण्यात काहीच अर्थ नाही. आता मोकळा श्वास घेत आहे. आम्ही भाजपात आंदोलनं केली, मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, आणि काही नेते हे आयत्या पिठावर रेगोट्ट्या मारतात. हे तर नव्हतेच त्याचा बाप ही नव्हता” असा निनावी टोलाही गायकवाड यांनी लगावला.