दीड वर्षांपूर्वी बांधलेली स्वच्छतागृहे : अजूनही दुर्लक्षित : परिसरात अस्वच्छता
– संदीप घोडके
येरवडा – स्वच्छ शहर स्पर्धेसाठी पालिकेचा आटापिटा सुरू असताना, दुसऱ्या बाजूला असलेल्या सुविधांकडेही कसे दुर्लक्ष केले जाते, याचा आणखी एक नमुना समोर आला आहे. दीड वर्षांपूर्वी काही लाख रुपये खर्चून फुलेनगर प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 येथे सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. पण, ती अजूनही वापरली जात नसल्याचे समोर आले आहे. तर, त्याच परिसरात मात्र नागरिक उघड्यावरच जात असल्याचे समोर आले आहे.
शहरात स्वच्छतागृहे आणि शौचालय नसल्याने उघड्यावरच अनेक ठिकाणी घाण केली जाते. अनेक स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक खाली गेला होता. त्यामुळे खासदार, आमदार, नगरसेवकांच्या निधीतून स्वच्छतागृह आणि शौचालये बांधली गेली, तर काहींची दुरुस्ती केली.
तत्कालिन आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रयत्नांतून फुलेनगर आरटीओ, कॉमर झोन आयटी पार्कसमोर, विश्रांतवाडी स्मशानभूमी, नागपूरचाळ येथे मोझे विद्यालयासमोर ही शौचालये बांधण्यात आली. पण, त्याचा वापर अजूनही सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कररुपी भरलेल्या पैशांची ही नासाडी असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरचाळ येथील शौचालय खुले असले, तरी येथे प्रचंड घाण असून, वॉश बेसिनमध्ये दारुच्या बॉटल्स फेकण्यात आल्या आहेत. येथील वीज कनेक्शन तोडलेल्या आहेत. या सर्वच शौचालयांना खिडक्या नाहीत. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात ही शौचालये बांधली, त्यांनीदेखील यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा का केला नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
…आतातरी लक्ष द्या
स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याचा क्रमांक घसरल्याने पालिकेची यापूर्वीच नाचक्की झाली आहे. तर, आता पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाले लक्ष देत ही स्वच्छतागृहे नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी होत आहे.