पुणे – वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते डिसेंबरनंतर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना “सावधान’ करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन महापौरांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केले आहे.
मोहोळ यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “आगामी काळात करोना संसर्ग वाढू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन नजीकच्या काळात आपण नियोजन केलेल आहे. यंत्रणाही सज्ज आहे. परंतू, करोना संसर्ग वाढू न देणे आपल्या हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचे आहे. सामूहिकपणे लढून हे दुसर संकट नक्की टाळता येऊ शकेल,’ असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यात मंगळवारी (दि. 17) दिवसभरात एकूण 368 नवीन करोना बाधित सापडले आहेत. त्यामध्ये पुणे शहरातील 163 बाधितांचा समावेश आहे. दिवसभरात 3 हजार 139 जणांची करोना चाचणी करण्यात आली. गेल्या 24 तासात 420 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 16 जणांचा मृत्यु झाला आहे. एकूण मृत्युपैकी पुणे शहरातील 6, पिंपरी-चिंचवडमधील 5, जिल्हा परिषद हद्दीतील 4 आणि नगरपालिका हद्दीतील 1 रूग्णाचा समावेश आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात मृत्युची नोंद झाली नाही. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 3 हजार 932 करोना बाधित उपचार घेत आहेत. तर 5 हजार 314 रूग्णांवर घरातच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 3 लाख 32 हजार 145 झाली असून, त्यातील 3 लाख 14 हजार 867 जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 196 रूग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत्यु झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 385 जणांचा समावेश आहे.