डॉ. भूषण पटवर्धन : पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे उद्घाटन
पुणे – ‘कन्टेन्ट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली ई-कन्टेन्ट विकसित करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. भविष्यात ही प्रणाली शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरतर्फे तयार केलेल्या “कन्टेन्ट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे उद्घाटन पटवर्धन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकरसह आदी उपस्थित होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, करोनामुळे एक खूप चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे समस्यांचे निदान आपण आपल्या देशातच शोधायला लागलो आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेली ऑनलाइन शिक्षण प्रणाली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पाश्चिमात्य देशांकडून जे काही येईल ते चांगलेच असेल, असा यापूर्वी आपल्या सर्वांचा समज होता. आता आपण वैज्ञानिक आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून शिक्षण कसे घेता येईल याचा जास्त विचार करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
डॉ. करमळकर म्हणाले, ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर सध्या 175 महाविद्यालयांनी सुरु केला आहे. करोनामध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीची झालेली सुरुवात ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे. लॉकडाऊन काळात अल्पावधीतच विद्यापीठातर्फे ई-कन्टेन्ट तयार करण्याची ही सुविधा महाविद्यालयांना उपलब्ध करून दिली. हजारांहून जास्त महाविद्यालये जोडता येऊ शकतात एवढी या ऑनलाइन शिक्षण प्रणालीची क्षमता आहे. त्यामुळे याद्वारे महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयांना या प्रणालीसोबत जोडण्याचे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले.