पुणे – दिवाळीच्या अनुषंगाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुण्याहून बरौनीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश असणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून 6 जादा सुपरफास्ट उत्सव विशेष गाड्या आठवड्यातून दोन दिवस धावणार आहेत.
पुण्याहून 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते बरौनी मार्गावर दर शुक्रवारी आणि रविवारी गाडी सुटणार असून, बरौनी येथे गाडी तिसऱ्या दिवशी पोहोचेल. तर 17 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत बरौनी येथून दर रविवारी आणि मंगळवारी विशेष गाडी सुटणार आहे.
पुण्यात ही गाडी दुसऱ्या दिवशी दाखल होणार आहे. या गाडीला अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.