मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांचा वाढदिवस. प्रवीण यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1974 पुण्यातील मुळशी या ठिकाणी झाला. सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रवीण विठ्ठल तरडे यांना ओळखले जाते.
घरी, थिएटर किंवा चित्रपटसृष्टी संदर्भातली कोणतीही पार्श्वभूमी नसतांना देखील प्रवीण तरडे यांची आवड त्यांना आपोआप ह्या क्षेत्रात घेऊन आली. सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना प्रवीण तरडे यांनी पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. पुरुषोत्तममध्ये लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी सर्व बक्षिसे घेऊन प्रवीण प्रसिद्धीच्या झोतात आले.
त्यानंतर प्रवीण तरडे यांनी अनेक एकांकिका आणि बहारदार मालिकांचं लेखन केलं. पहिल्यांदा प्रवीण तरडे यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘कुंकू’ या मालिकेसाठी लेखन केलं. पुढे हळूहळू अनेक यशस्वी मालिका प्रवीण तरडे यांनी लिहिल्या.
‘देऊळबंद’ ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल या सुद्धा मराठी कलाविश्वात उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.