कार्यक्रमांना परवानगी नाहीच : कलाकारांत नाराजीचे “सूर’
पुणे – शहरातील नाट्यगृहे, उद्याने खुली झाल्याने आता दिवाळीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता पुणेकरांना वाटत होती. मात्र, महापालिकेने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा कलाकारांमध्ये नाराजीचा “सूर’ आहे. परिणामी, दरवर्षी दिवाळी पहाटच्या दिवशी गर्दीने फुलणारी उद्याने, नाट्यगृह यंदा सुनीसुनी वाटणार आहेत.
सांस्कृतिक राजधानी पुण्यात नागरिकांना “दिवाळी पहाट’सारख्या कार्यक्रमांचा “फराळ’ अनुभवायला मिळतो. अनेक दशके पुण्यात “दिवाळी पहाट’चे कार्यक्रम दिवाळीच्या आनंदात भर घालतात. दरवर्षी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर, सारसबागेसह विविध उद्यानांमध्ये दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, दिग्गजांच्या कलांचा आनंद घेणे ही पुणेकरांसाठी पर्वण असते.
मागील सात महिन्यांपासून बंद असणारी नाट्यगृहे रंगभूमी दिनाच्या औचित्याने सुरू झाली. यामुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमांची नांदी होईल, असे कलाकारांना वाटत होते. अनेकांनी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात सुरूवात केली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी पुणे महापालिकेने सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे जाहीर केले. त्याऐवजी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्याचे महापालिकेने नमूद केले. परंतु, प्रत्यक्ष सादरीकरणाचा “फील’ ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये येत नसल्याचे आयोजक सांगतात.
रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू झाल्याने कलाविश्वात आनंदाचे वातावरण होते. शासन आणि प्रशासनामध्ये सुसंवाद नसल्याने या आनंदावर विरजण पडले आहे. सात महिन्यांनंतर सांस्कृतिक क्षेत्राला सुगीचे दिवस येतील, असे वाटत होते. त्यादृष्टीने कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात येत होते. मात्र, पालिकेच्या निर्बंधांमुळे कलाकारांना पुन्हा मागे जावे लागणार आहे.
– सुनील महाजन, “संवाद’ पुणे