वॉशिंग्टन – अमेरिकेच्या इतिहासात नवा अध्याय लिहण्यासाठी मी आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन सज्ज आहोत. कष्टकरी कुटुंबाना लाभ देणारी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत, असे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सांगितले.
करोनाची साथ, आर्थिक स्थिती पुर्ववत करणे, वांशिक समानता आणि वातावरण बदल ही बिडेन सरकारपुढील प्राधान्याची कामे असल्याचे रविवारी त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकन नागरिकांचे कठोर परिश्रम आणि चातुर्य यासांरखे अर्थव्यवस्थेला सुरळीत करणारे दुसरे आर्थिक इंजिन नाही, असे बिडेन यांनी म्हटले आहे.
आपण तोंड देत असलेली आव्हाने पार करू, असा विश्वास कर्मचाऱ्यांमध्ये राहिला नाही. त्यामुळे बिडेन – हॅरिस प्रशासन या मध्यमवर्गीयांना पुन्हा उभे करण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पेचाच्या काळात चांगला पगार देणाऱ्या लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची योजना बिडेन आखत आहेत. कर्मचारी संघटना उभारून एकत्रित मागण्यांसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. कष्टकरी कुटुंबाना पुन्हा वैभवाचे दिवस दाखवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.