साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल
पुणे – दिवाळी अनुषंगाने परिवहन विभागाकडून प्रवासी वाहतुकीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याचे उल्लंघन केल्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली.
मागील 15 दिवसांत 51 वाहनांना मेमो दिला. तर, संबंधितांकडून साडेचार लाख रुपयांचा दंड आकारला.
पुणे कार्यालयाची तीन आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या दोन भरारी पथकांनी पुणे जिल्ह्यात ही कारवाई केली.
वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक (टपावरून मालवाहतूक करणे), सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची रचना नसणे आदी कारणांमुळे ही कारवाई केली. 19 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत सुमारे 229 वाहनांची तपासणी केली. त्यापैकी 51 वाहनांना मेमो दिला.
तर, 43 वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यापैकी 16 वाहने परराज्यातील आहेत. त्यातील 17 वाहने सोडली असून, अन्य वाहनांबाबतची प्रक्रिया सुरू आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सुमारे 4 लाख 61 हजार 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर 14 लाख 29 हजार 913 रुपयांचा करदेखील वसूल केला.
परिवहन विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, बसमध्ये प्रवेश करताना थर्मल गनने तपासणी व्हावी, बसेस निर्जंतुकीकरण आदीबाबतचे निर्बंध जाहीर केले आहेत.