मुंबई – शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने दिवाळीत फटाके बंदीचा निर्णय घोषित केला आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी हा निर्णय घेणे भाग पडत आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.
तथापि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक दिवस कमी आवाजाचे फटाके उडवण्यास अनुमती देण्यात आली आहे. लक्ष्मीपूजन 14 नोव्हेंबर रोजी आहे. त्यादिवशी फुलबाज्या, भुईनळे अशी शोभेची दारू उडवण्यास अनुमती राहणार आहे.
नागरिकांनी कोविड विषयक निर्बंध लक्षात ठेऊन हा सण साजरा करावा असे आवाहनही महापालिकेने केले आहे. फटाक्यांच्या अनिर्बंध वापरामुळे जो धूर निर्माण होतो त्यातून श्वसनास अडथळा येऊ शकतो आणि करोना रुग्णांसाठी हा प्रकार अधिकच धोकादायक ठरू शकतो असे महापालिकेचे म्हणणे आहे.
साथीचे रोग कायद्याअंतर्गत अशी बंदी घालता येऊ शकते, असेही महापालिकेने म्हटले आहे. अन्य राज्यांमध्ये अशा स्वरूपाचे जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा अभ्यास करूनच हा आदेश काढण्यात आला आहे, असे स्पष्टीकरणही महापालिकेने दिले आहे.