सर्पदंश झालेल्या महिलेच्या उपचारासाठी 9 किमी पायपीट

अतिदुर्गम चांदरमधील घटना ः रस्त्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

वेल्हे-अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे) येथील ज्येष्ठ महिला बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय 65) यांना विषारी सापाने दंश केला. सरपंच संतोष कोकरे व ग्रामस्थ यांनी प्राथमिक उपचार करून रस्ता नसल्याने गाडी येण्याचा कोणता मार्ग नव्हता.म्हणून त्यांना उपचारासाठी लाकडाची झोळी करून तब्बल 9 किमी उचलून नेले व खासगी गाडी करून त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

या घटनेनंतर ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सांगळे या चांदर ते डिगेवस्ती येथे पायी प्रवास करत होत्या. चांदर येथे रस्ता नसल्याने पायवाटेने चालत असता वाटेत दाट गवत व झुडपे असल्याने त्यामधून अचानक एक विषारी साप निघून बारकाबाई सांगळे हिच्या पायाला दंश केला. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्याने त्यांनी ओरडा सुरू केल्याने ग्रामस्थांनी त्यांना झोळीत टाकून नऊ किलोमीटरची पायपीट करीत उपचारासाठी दाखल केले. अतिदुर्गम चांदर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी नऊ किमी दाट गवत व झुडपातून मार्ग काढत झोळीत टाकूनच आणावे लागते. कारण या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून आजतागायत रस्ता गेला नाही. प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर रस्ता गेला पाहिजे हे सरकाराचे धोरण असूनही या धोरणांची अंमलबाजवणी मात्र होताना दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.