सेंद्रीय शेतीकडे जास्त लक्ष द्या

आमदार दिलीप मोहितेंचे शेतकऱ्यांना आवाहन : राजगुरूनगर येथे मृदू दिनानिमित्त कार्यक्रम

राजगुरूनगर- मृदू परीक्षण काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे जास्त लक्ष द्यावे, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्यानुसार पीक नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.

राज्य शासन कृषी विभागाच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या माध्यमातून जागतिक मृदा दिनानिमित्ताने राजगुरूनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विजय घाव्हटे, विभागीय कृषी संचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब पडघलमल, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव डॉ. भरत टेमकर, कांदा लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, जिल्हा मृदू सर्वेक्षण व तपासणी अधिकारी रवींद्र वाडकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, तंत्र अधिकारी वैशाली भुसावरे, मंडल कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, नंदकुमार वाणी, विजय पडवळ, खेड पंचायत समितीचे सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, अमर कांबळे, मच्छिंद्र गावडे, सुनीता सांडभोर, नंदा शिंदे यांच्यसह मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आमदार मोहिते पाटील म्हणाले, रासायनिक शेतीच्या युगात माती परीक्षण ही काळाची गरज झाली आहे. त्यानुसार पिक नियोजन करून पीक घेतले तर चांगले उतपन्न मिळते. राज्यात अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी माती परीक्षण करीत नाहीत. पारंपरिक शेती शेतकरी करीत असल्याने त्याला चांगले उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी कृषी विभागाकडून प्रचार प्रसार जास्तीत जास्त केला पाहिजे. माती परिक्षणातून कोणते नत्र, जिवनसत्व जमिनीत आहेत हे समजल्यानंतर त्यायोगे जास्त उत्पादनाची पिके घेतली जातील. आपण शरीराची जशी काळजी घेतो तशी जमिनीची काळजी घेतली पाहिजे.

शेणखताचा वापर केला पाहिजे. ऑरगॅनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. जमिनीत रासायनिक खतांचा वापर कमी करावा आपल्या शेतात शेणखत व सेंद्रिय खतांचा वापर करावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्यावतीने अजय टाकळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना जमिनीची माती तपासणी केलेल्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी अभार मानले.

  • अधिकाऱ्यांना आवाहन वजा धाक
    तालुक्‍यात सर्व विभागाचे अधिकारी एकत्र यावेत असे नियोजन करून सर्व कार्यालये एका ठिकाणी आणली आहेत. मात्र कार्यालयात काम करणारे अधिकारी यांच्यात एकवाक्‍यता नाही. अधिकाऱ्यांना विनंती आहे. मला काम प्यारे आहे. टूकारपणा मी खपवून घेणारा नाही. मागील 5 वर्षे आपण काय केले याबाबत मला घेणे नाही मात्र, आता कामात कुचराईपणा खपवून घेणार नाही कामाच्याबाबत अधिकारी कर्मचारी वर्गाला सवलत मिळणार नाही. पुढील 5 वर्षांचे नियोजन केले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवणे माझे काम आहे. म्हणून अडचणी सांगा त्या सोडवल्या जातील. विकासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वजा धाक यावेळी दिलीप मोहिते यांनी त्यांच्या भाषणातून दाखवून दिला

Leave A Reply

Your email address will not be published.