सातारा – सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या उर्वरित प्रभागांसाठी मंगळवारी सरासरी 80.49 टक्के मतदान झाले. लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या नगरपंचायतींमध्ये एकूण 13 हजार 818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 82 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. या सर्व नगरपंचायतींच्या सर्व जागांची एकत्रित मतमोजणी उद्या, दि. 19 रोजी होणार असून, निवडणुकीच्या निकालाबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे.
ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपंचायतींच्या प्रत्येकी 13 जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण केली होती. उर्वरित चार प्रभागांमधील निवडणुकीला स्थगिती दिली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत, उर्वरित प्रभागांसाठी 18 जानेवारीला मतदान व 19 जानेवारीला सर्व जागांची एकत्र मतमोजणी करायचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 23 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात एकूण 31 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली.
लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा येथील प्रत्येकी चार व दहिवडी नगरपंचायतीच्या तीन जागांसाठी एकूण 82 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 17 हजार 168 मतदारांपैकी 13 हजार 818 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोणंदमध्ये 79 टक्के, कोरेगावात 79.79 टक्के, पाटणमध्ये 76.48 टक्के, वडूजमध्ये 81 टक्के, खंडाळ्यात 84.89 टक्के, तर दहिवडीत सर्वाधिक 85.03 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी सरासरी 80.49 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.
कोरेगावमध्ये आ. शशिकांत शिंदे विरुद्ध आ. महेश शिंदे असा “हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगला. सर्वच नगरपंचायतींमधील निकालांची उत्सुकता जिल्हावासीयांना आहे. प्रत्येक नगरपंचायत कार्यक्षेत्रात उद्या (बुधवार) मतमोजणी होणार असून, दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे.