पुणे – वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा आरंभ सोमवारपासून होत आहे. विघ्नहर्त्याचा हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून उत्सवाच्या कालावधीत 7 हजार पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.
गणेशोत्सवासाठी बाहेरील शहरातून अतिरिक्त कुमक मागविण्यात येणार आहे. तसेच तब्बल 40 हजार सीसीटीव्हीचा वॉचही उत्सवावर रहाणार आहे. संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरीत नियंत्रण कक्षाला कळवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरातील संवदेनशील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ) तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलातील जवान (होमगार्ड) मध्यभागात बंदोबस्तासाठी राहणार आहेत. बेलबाग चौक, मंडई परिसरात गर्दी होते. या परिसरात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे.
मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत.
पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पुणे शहरात नोंदणीकृत यंदा 3 हजार 245 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. तर, ध्वनिवर्धकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन मंडळांनी करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सी-वॉच योजनेची मदत
शहर तसेच उपनगरात शासनाने 1,247 सीसीटीव्ही बसविले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी सी-वॉच योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. या योजनेअंतर्गत शहरात खासगी सहभागातून 30 हजार सीसीटीव्ही बसविले आहेत.