पुसेगाव (सातारा) – इतर राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात ७४ लाख १८ हजार ४८५ रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली आहे. सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार (दि. २२) रोजी पुसेगाव (ता.खटाव) येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात झाला. रथ मिरवणुकी दरम्यान रथावर विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या. यात २० रूपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. तर १ रूपयांच्या नोटाही भाविकांनी मनोभावे अर्पण केल्या. यात्रा २७ डिसेंबर पर्यंत असली तरी संक्रांतीपर्यंत यात्रा सुरूच राहणार असून या काळातही देणगी रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक भक्तांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत आहे. आपला नवस पूर्ण व्हावा किंवा बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक मोठ्या श्रध्देने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरूपात देणगी अर्पण करतात. पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लाऊन श्रींच्या रथावर मोठ्या मनोभावे १०,२० ५० १०० ,५०० तसेच २००० रूपयांच्या नोटांच्या माळा उत्स्फुर्तपणे श्रध्देने अर्पण केल्या.
रथोत्सवादिवशी पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी ११ वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला. भाविकांनी आपापल्या परीने नोटांच्या माळा करून रथावर अर्पण केल्या. नोटांनी शृंगारलेला महाराजांचा रथ तसेच भाविकांनी सेवागिरी महाराजांच्या रथसोहळ्याला हजेरी लावल्याने रथावर देणगी किती जमा होणार याबाबत लोकांना उत्सुकता लागली होती.
सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणूकीस गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणी रात्री ११ .३० वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहचला. मंदिरासमोर नोटांनी शृंगारलेला रथावरुन नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगीरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री बारा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.
रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, न्यू सातारा समुह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-ऑप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चट पतसंस्था, व विविध बँका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वंयसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सेवागिरी महाराजांचा लौकीक दिवसेंदिवस वाढत चालला असून साता समुद्रापार महाराजांची किर्ती पसरत आहे. यावर्षी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशातील चलनी नोटा भक्तांनी अर्पण केल्या. यामध्ये युनायटेड अरब अमिरातीच्या धीरमच्या नोटा, कतारचा रियाल, युरो नोटा, इंग्लंडचे पौंड, यु.एस.एड्ढची डॉलरच्या नोटा, दुबईच्या चलनी नोटांचा समावेश आहे.