बीजिंग – ताजिकीस्तानच्या दुर्गम भागामध्ये आज 6.8 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. चीनच्या शिन्जियांग प्रांताच्या सीमेला लागून असलेल्या या भागात अत्यंत विरळ लोकसंख्या असल्यामुळे जीवित अथवा वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे कोणतेही वृत्त उपलब्ध नाही.
ताजिकीस्तानमधील मुरघोबच्या पश्चिमेला 67 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली 20 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे युएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. पामिर पर्वतरांगांमध्ये असलेले मुरघोब हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून या शहराची लोकसंख्या जेमतेम काही हजारांची आहे.
भूकंपाचा हा धक्का सीमाभागात मोठ्या प्रमाणात जाणवला. चीनमधील शिन्जियांग प्रांतातील काशगर आणि किझील्सू किरगीझ स्वायत्त भूभागांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र तेथे जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
वेस्ट बॅंकेवर इस्रायलच्या हल्ल्यात 11 पॅलेस्टिनी ठार, 100 पेक्षा अधिक जखमी
चीनमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी नोंदवली गेल्याचे “चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर’ने म्हटले आहे. तेथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर असल्याचेही म्हटले गेले आहे. भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदूबाबत विविध निरीक्षण संस्थांनी नोंदवलेली निरीक्षणे वेगवेगळी आहेत.