शिर्डी – कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर गेल्या सात महिन्यात तब्बल 64 लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले आहे. तसेच साईंच्या दानपेटीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही माहिती दिली.
शिर्डी हे राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी आहे. येथे साईंच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच आपापल्या आर्थिक समृद्धतेनुसार मंदिरातील दानपेटीत तसेच दान पावती करत दान देत असतात. रोख रकमेसह भाविक सोने-चांदी तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. करोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी साईंच्या दानपेटीत भरभरून दान दिले आहे. ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहे.