नाशिक – नाशिक शहरातील सय्यद पिंप्री येथे 100 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या नियोजित कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे, असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
सय्यद पिंप्री येथील कृषी टर्मिनल प्रकल्पाच्या जागेची पाहणी छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी त्यांनी सर्व्हे नं 1654 मधील 100 एकर जागा या प्रकल्पाला लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील उत्पादित शेतमालाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. हे कृषि टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्याचा थेट बाजाराशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच ओझर विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने दळणवळणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
तसेच या कृषी टर्मिनल मार्केटमध्ये फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मास, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणुक करता येणार असून या कृषि टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.