भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये 6 धनुष तोफा दाखल

जबलपूर (मध्यप्रदेश)- जबलपूरमधील “गन कॅरिएज फॅक्‍टरी’मध्ये आयोजित एका समारंभामध्ये धनुष या अत्याधुनिक तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये जमा करण्यात आल्या. “ऑर्डिनन्स फॅक्‍टरी बोर्ड’ने या तोफा लष्कराच्या स्वाधीन सोपवल्या.

धनुष तोफांची व्यापक प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी “ऑर्डिनन्स फॅक्‍टरी बोर्डा’ला नुकतीच लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. एकूण 114 तोफांची निर्मिती केली जाणार आहेत. यामधील पहिल्या 6 तोफांची पहिली तुकडी आज लष्कराच्या सेवेत दाखल करण्यात आली.

धनुष ही 155 मिमी लांब आणि 45 मिमी व्यासाची तोफ संपूर्ण भारतीय बनावटीची तोफ आहे. या तोफेतून 38 किलोमीटर दूरपर्यंत मारा केला जाऊ शकतो. स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे एकाचवेळी एकाच लक्ष्यावर 6 तोफांचा मारा केला जाऊ शकतो. यातील प्रत्येक तोफ प्रत्येक तासाला 42 गोळे डागू शकते, असे “ओएफबी’चे अध्यक्ष सौरभ कुमार यांनी सांगितले. या तोफेचे वजन 13 टनांपेक्षा कमी असून अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात ही तोफ सहज हलवली जाऊ शकते. प्रतिकूल वातावरणातही या तोफेचा चांगला वापर केला जाऊ शकतो. या तोफेमध्ये अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली, स्वयंनियंत्रित लक्ष्याचा शोध घेण्याचे तंत्र आणि दिवसाबरोबर रात्रीही मारा करण्याची क्षमता आहे. “मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत “धनुष’ची निर्मिती होणे हे या उपक्रमाचे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.

“धनुष’ तोफेच्या पुढील दोन आवृत्त्यांवर “ओएफबी’सध्या काम करत आहे. त्यामध्ये वाहनावर बसवलेल्या तोफेचाही समावेश आहे. “धनुष’ तोफेच्या निर्मितीमध्ये लष्कर, “डीआरडीओ’, डायरेक्‍टर जनरल क्‍वालिटी ऍश्‍युरन्स, भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड, सेल आणि अन्य खासगी कंपन्यांचे योगदान आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.