लंडन – पश्चिअ इंग्लंडमधून भारतीय वंशाची एक महिला बेपत्ता झाली असून तिच्या शोधासाठी इंग्लंडच्या पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. उमा कुलकर्णी असे या महिलेचे नाव असून हेरेफोर्डशायर येथील घरातून ती बेपत्ता झाली आहे. त्या ऍव्होन आणि सोमर्सेट येथे आपल्या कारमधून गेल्या असल्याचा अंदाज आहे. त्यांची टोयोटा ऑरिस कार सेव्हन ब्रिजजवळ आढळून आली आहे.
उमा कुलकर्णी या 42 वर्षीय असून 5 फूट उंचीच्या सडपातळ बांध्याच्या आशियाई महिला आहेत. त्या नेहमी इअररिंग्ज घालतात. त्या बेपत्ता झाल्या तेंव्हा त्यांनी काय पोषाख परिधान केला होता, याची माहिती उपलब्ध नाही. त्या अगदी अलिकडे हेरीफोर्डमधील “कॅन्टिलप ऍन्ड हम्प्टन डेनी सर्जरीज’मध्ये कामाला लागल्या होत्या.
“उमा कुलकर्णी यांना शोधण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. त्या नॉर्थ सोमर्सेट किंवा ब्रिस्टल भागात असण्याची शक्यता आहे.’ असे ऍव्होन आणि सोमर्सेट पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उत्तर सोमर्सेट आणि सेव्हन ब्रिज परिसरामध्ये उमा कुलकर्णींचा शोध घेतला जात असून नागरिकांनाही त्यांच्या शोधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले गेले आहे.