जलप्रलयाची 58 वर्षे : डोळ्यांत पाणी अन्‌ अंगावर काटा

पुणे – पानशेत धरण फुटून पुण्यात झालेल्या जलप्रलयाला 12 जुलै 2019 रोजी 58 वर्षे पूर्ण झाली. या प्रलयाचे अनेक साक्षीदार आजही पुण्यात आहेत. तो प्रसंग आठवला, तरी त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. या धरणफुटीने अनेकांना विस्थापित केले.

सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी हे धरण फुटले आणि हाहा:कार माजला. बंडगार्डन पूल सोडून त्यावेळी असलेले सगळे पूल पाण्याखाली गेलेच, परंतु त्या बाजूला वसलेले शनिवार पेठ, नारायणपेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ, डेक्कन परिसर सगळा पाण्याखाली गेला. येथील लोकांनी अक्षरश: फर्ग्युसन टेकडी, पर्वती यांचा आश्रय घेतला. आपल्या डोळ्यादेखत आपले घर, किमती साहित्य वाहून जाताना अनेकांनी पाहिले. याच घटनेला दि.12 जुलै रोजी 58 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने या घटनेला दिलेला हा उजाळा!

पानशेत धरण का फुटले?
बांधकाम झाल्यानंतर एका बाजूची माती कच्ची असल्याने तिच्यातून गळती सुरू झाली. दुसरीकडे पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. गंभीर परिस्थिती पाहून लष्कराची मदत घेण्यात आली. त्यांनी माती, डबरची पोती टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्याचा लोंढाच इतका जबरदस्त होता, की शेवटी 12 जुलै 1961 ला पानशेत धरण फुटले. आणि धरणातील पाणी वेगाने पुण्याच्या दिशेने येऊ लागले. प्रचंड वेळेने येणारे पाणी खडकवासला धरणात येणार असल्याने त्यालाही धोका होता. तेव्हा त्यात स्फोट करून मधला भाग उडविण्यात आला. धरण फुटल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने प्रशासनाने काळजी घेऊन नदीच्या परिसरातील सर्व रस्ते बंद केल्याने पूरात जीवितहानी झाली नाही. पण, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पानशेत पुरात शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांच्यासाठी गोखलेनगर, पर्वती, राजेंद्रनगर, महर्षीनगर येथे तातडीने घरे बांधण्यात आली.

58 वर्षानंतर घरे मालकीची
सन 1961 मधील पानशेत महाप्रलयानंतर 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या वसाहती मालकी हक्काने देण्याला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. त्याचा फायदा सहकारनगर भाग 1 आणि 2, पद्मावती या भागातील 103 पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांमधील सुमारे 2 हजार 50 पूरग्रस्त कुटुंबांना होणार आहे. दि.1 फेब्रुवारी 1976 च्या बाजार मूल्यानुसार या जमिनींची किमत ठरविली जाणार आहे आणि 1991 च्या प्राईम लॅंडिंग रेटनुसार व्याज आकारून मालकी हक्काने त्या मिळणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंबंधात त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता या वसाहतींमधील पूरग्रस्तांची घरे आता मालकी हक्काने होणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून त्यांना आता घरांचे विकसनही करता येणार आहे.

धरणाची पार्श्‍वभूमी
इ.स. 1950 च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून 13 कि.मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्‍चिमेस मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. 10 ऑक्‍टोबर 1957 रोजी पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरूवात झाली. ही जरी वस्तुस्थिती असली, तरी प्रत्यक्षात हे धरण बांधण्याचा विचार त्याहून आधी 50 वर्षे म्हणजे सन 1907 मध्ये करण्यात आला होता. परंतु त्याचे प्रत्यक्षात काम 1957 मध्ये सुरू झाले.

खडकवासला हे धरण 1880 मध्ये बांधण्यात आले. शहराची लोकसंख्या वाढली तसे हे तीन लक्ष दक्षलक्ष घनफूट पाण्याच्या क्षमतेचे धरण अपुरे पडू लागले आणि पानशेत धरणाचा विचार 1907 मध्ये सुरू झाला. त्यानुसार खडकवासला धरणाची उंची वाढवणे, पानशेत आणि वरसगाव या खडकवासल्याच्या पश्‍चिमेकडील सुमारे 10 मैलांवर आणखी दोन धरणे किंवा खडकवासलाजवळ आणखी एक दगडी धरण अशा तीन पर्यायांचा विचार सुरू झाला. 1932 सालापर्यंत हा विचार सुरू होता. परंतु त्यावर निर्णय झाला नाही आणि तो पुढे ढकलला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.