मंचर – मंचर-बेल्हा रस्त्यावरील पिंपळगाव फाटा-तुकानाना चौक येथे पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्ट कार्यान्वित केले आहे. बुधवार (दि. 25) गुरुवार (दि. 26) मिळून 250 तर शुक्रवारी (दि. 27) 160 व शनिवारी (दि. 28) 140 या चार दिवसांत एकूण 550 वाहनांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे यांनी दिली.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यानुसार वाहनांची तपासणी करण्यासाठी पिंपळगाव फाटा (तुकानाना चौक), लोणी, डिंभे, तळेघर येथे चेकपोस्ट सुरू केले आहे. तसेच दिवसा आणि रात्रीची 8 पथके असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. वाहनांमध्ये जास्तीत जास्त 20 हजार रुपयांची रोकड बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर वाहनात 20 हजार रुपयांच्या पुढील रक्कम सापडल्यास त्याचे पुरावे द्यावे लागतील. पुरावे समाधानकारक न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे खराडे यांनी सांगितले. पिंपळगाव फाटा (तुकानाना चौक) येथे चेकपोस्ट पथक क्रमांक 2 मधील पथकप्रमुख पप्पु उगले, सहायक कर्मचारी अशोक कुलाळ, मंगेश लोखंडे, राजू चासकर यांनी बुधवारी 110 वाहने तर गुरुवारी 130 वाहनांची तपासणी केली.