बारामती -फ्रेंडशिप डेनिमित्त बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित फ्रेंडशिप डे रन बारामती इंटरनॅशनल व्हर्चुअल मॅरेथॉन लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करीत उदंड प्रतिसादात पार पडली. मॅरेथॉनमधील सर्वांच्या धावण्याचा सरासरी आकडा 52 हजार किलोमीटरवर पोहोचला.
झिम्बाब्वे, युनायटेड स्टेटस, दुबई, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, नायजेरिया, लेबनान आदी 27 देशांतील रनर्स सहभागी झाले होते. देशभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. हे स्पर्धक विधायक हेतूने प्रेरित होऊन धावले. बारामती परिसरातील 1000 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये व्यायामाची आवड, आरोग्याबाबत जागृत करणे हा मुख्य उद्देश ठेवूनच आयोजन केले होते. आपण भारतीय आरोग्याबाबत जागरूक आहोत, हाच संदेश सहभागी स्पर्धकांनी दिला. मॅरेथॉनमध्ये एकूण 5 हजार 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी यशस्वी आयोजन केले. सुनेत्रा पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शनही केले. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, कार्व्हर एव्हीएशन, अक्षय शिंदे फाऊंडेशन, जोतीचंद भाईचंद सराफ, मगर ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट, वैष्णवी ग्राफिक्स, अभिषेक पब्लिसिटी, आदित्य मीडिया, बारामती सायकल क्लब संस्थांनी सहकार्य केले. एन्व्हार्यमेंटल हेल्थ क्लब, वुई द फ्युचर ग्रुप, रनर्स ग्रुप या क्रीडा संस्थांनीही सहकार्य केले.