सागर येवले
पुणे – करोनाच्या संसर्गाने शहरासह जिल्ह्याला विळखा घातला असून, त्यामध्ये नवजात बालकांनाही करोना झाल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले. ससून रुग्णालयात जन्मानंतर आईच्या संपर्कात आल्यामुळे एक दिवसाच्या सहा बाळांना करोनाची लागण झाली. तर काही बाळांना करोनासह कावीळ आणि अन्य आजार झाल्याचे समोर आले. या परिस्थितीत डॉक्टर आणि वॉर्डमधील परिचारिका यांनी त्या बाळांची आई होऊन उपचार दिल्यामुळे त्यांना जीवनदान दिले. आज सहाही बालके करोनामुक्त झाले असून, त्यांच्या आईच्या कुशीत गेले.
ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या की, ससून रुग्णालयात प्रसूतिसाठी येणाऱ्या महिलेची करोना चाचणी केली जाते. त्यानुसार या सहाही बाळांच्या आईची प्रसूतिपूर्वी करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. मात्र, प्रसूति नंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून आढळून आले. त्यावेळी जन्मलेल्या बालकांची चाचणी केली असता आईच्या संपर्कात आल्याने त्यांनाही संसर्ग झाला होता. त्यामुळे त्या सहाही बालकांना आईपासून वेगळे ठेवले होते. त्यातील काही बालकांना संसर्ग झाला तर काहींना कावीळसह अन्य आजार झाले होते. या सहाही बालकांचा जन्म एका मागे एक असा झाल्याने त्यांना 10 ते 14 दिवस स्वतंत्र ठेवण्यात आले. यातील काही बाळांना दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
करोनाग्रस्त बाळांना मिल्क बॅंकेतून दूध
प्रसूतिनंतर ज्या मातेला दूध येत नाही किंवा उशिरा येत असल्यामुळे त्यांच्या बाळांना आईचे दूध मिळत नाही. त्यासाठी ससून रुग्णालयात मिल्क बॅंक सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रक्तदानाप्रमाणेच रुग्णालयात बाळंतपणानंतर नियमित तपासणीसाठी येणाऱ्या मातांकडून त्यांचे दूध दान केले जाते. हे दूध आजही करोनाच्या काळात नवजात बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. कारण, संसर्ग झालेल्या काही बालकांना स्तनपानाची अडचण होती. त्यावेळी वॉर्डमधील परिचारिकांनी त्यांची विशेष खबरदारी घेतली. काही बाळांना मिल्क बॅंकेतील दूध दिले जात होते. त्यामुळे आज ही सहाही बालके बरी झाली.